Sports

हॅपी बड्डे सचिन भाऊ, नॉट आउट @ ५० 🏏

आता मी वानखेडे स्टेडियममध्ये बसलोय…समोर इंडिया पाकिस्तान मॅच सुरु…पूर्ण स्टेडियम लोकांनी गचगचून भरलेलं… आणि आता इंडियाची बॅटिंग सुरु होणार. संपूर्ण स्टेडियम मधून एकच आवाज ‘सचिन’ ‘सचिन’ आणि तेंडुलकर मैदानात आला. प्रेक्षकांना सचिनच्या फलंदाजीचा पहिला बॉल बघण्याची आतुरता त्यातच सचिन येतो अन् पहिल्या बॉल वरच चौकार….! मैदानात तो जल्लोष सचिन नावाचा जयजयकार आणि आता मॅचला झाली खरी सुरुवात. म्हणजेच सांगायचं झालं तर इतकं प्रेम, एवढा मोठा फॅन बेस, जगभरात ज्याला क्रिकेटचा देव म्हणतात अशा सचिन तेंडुलकरचा यंदा ५० वा वाढदिवस.

सचिन तेंडुलकर याने क्रिकेटच्या दुनियेत विक्रम गाजवला. असंख्य मॅचला शतकेपार धावा करून भारताचे नाव रोशन केले. नुसतं देशात नव्हे तर जगभरात या सचिन भाऊला पसंती असल्याचे दिसत आहे. त्याच्या वाढदिवसाला जगभरातुन अक्षरशः उत्सव साजरा केला गेला. मात्र सचिनने सोशल मीडियावर दोन वाक्यात वाढदिवसाची पोस्ट टाकली. वाढदिवसाच्या दिवशी सकाळच्या वेळेत चहा पितानाची पोस्ट सचिनने केली आहे. Tea time: 50 Not Out! असं म्हणत त्याने स्वतःला शुभेच्छा दिल्या आहेत.

एवढा मोठा क्रिकेटर त्याचा वाढदिवस जल्लोषात करेल. पन्नास वर्षांचा झाला म्हणून मोठी पार्टी ठेवली जाईल. अभिनेते, प्रसिद्ध खेळाडू, नेतेमंडळी, मोठमोठे व्यावसायिक त्याच्या वाढदिवसाला येतील. असे वाटत असताना त्याची हि सकाळची फेसबुक पोस्ट अविस्मरणीय ठरली. लाखो चाहत्यांनी त्याला इथंच वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

सचिन तेंडुलकरने कधीही स्वतःबाबत मोठेपणा बाळगला नाही. रस्त्यावरून येताजाता सामान्य माणसाशी बोलणे, स्टॉलवर चहा पिणे, गल्ली क्रिकेट खेळणाऱ्या पोंरांमध्ये जाऊन खेळणे, कोणालाही मदत करणे अशा स्वभावामुळे त्याला देवता म्हंटले जाते. त्याचे असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहणारा आपला सचिन अशी त्याची नवी ओळखच निर्माण झाली आहे.

सचिनला स्वतःचा वाढदिवस करायला वेळ मिळाला नसेल का? पण ज्याचे लाखो चाहते आहेत त्यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा यामुळेच त्याला वाढदिवस साजरे झाल्यासारखे वाटते. त्यादिवशी सचिनच्या अनेकांनी भेटी घेतल्या. अंत्यत निरागसपणे तो सर्वाना भेटला. काही गावात तर त्याच्या फोटोसमोर केक कापून सेलिब्रेशन करण्यात आले. तर काही ठिकाणी या क्रिकेटच्या देवाची मिरवणूक काढण्यात आली.

खरंच क्रिकेटमध्ये नावं कमावून त्याने जग जिंकलं आहे. तेंडुलकर आता रिटायर झाला तरी वर्षानुवर्षे त्याचा फॅन फॉलोअर वाढत राहणार आहे. आता कुठं सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याने क्रिकेट क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. त्याने सुद्धा वडिलांप्रमाणे नाव कमवावे अशा शुभेच्छा सचिनच्या चाहत्यांकडून त्याला मिळू लागल्या आहेत. सचिन भाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!