पैसे के पिछे मत भागो… काम ही ऐसा करो की पैसा खुद्दही तुम्हारे पिछे आ जाये…! मला आयुष्यात आलिशान गाडीतून फिरायचंय. बंगला, मोठ्या घराचं स्वप्नही आहे. परदेश दौराही करण्याची इच्छा आहे. मोठं व्हायचंय, जीवनात प्रगती करायची आहे. पण जवळ तेवढा पैसा नाही. किंवा जेवढा आहे त्यात एवढं सगळं तरी होऊ शकत नाही. अशीच काहींची अडचण आपल्याला समाजात दिसू लागलीये. माणूस सद्यस्थितीत आर्थिक मंदी, महागाई, आरोग्य खर्च या गोष्टीमध्ये अडकून तणावग्रस्त आयुष्य जगतोय. त्यासाठी पैसा कमावण्याच्या मागे लागलाय. पैसा जास्तीत जास्त प्रमाणात कमावणे, आपली स्वप्ने पूर्ण करणे यात काही वाईट अजिबात नाही.
पण त्यासाठी योग्य मार्ग अवलंबणे गरजेचे आहे. अनेक जण तर महागाई वाढतीये म्हणून रडत बसतात. खरंतर ही वाढणे अथवा कमी होणे आपल्या हातात नाही. किंवा महागाईवर सतत कोणालाही दोष देत राहणं बरोबर वाटत नाही. पण त्यावर मार्ग नक्कीच काढता येतो. म्हणून वाईट मार्गाने पैसे मिळवण्याचा प्रयत्न करावा का? या प्रश्नाचं उत्तर आपण स्वतः शोधलं पाहिजे. यावरूनच एक उद्योजक रिलच्या माध्यमातून सांगतो की, वाईट मार्गाने मिळवलेले पैसे म्हणजे प्रेतावरची फुलं आहेत. धड हसूही देत नाहीत. आणि रडूही देत नाहीत. दहा साखर कारखान्याचे शेअर्स घेता येतील.
पण डॉक्टर सांगतील ते औषध चमचाभर तुम्ही खाऊ नका. झोपायलाही 10 लाखांचा बेड घेतला जातो. पण मणक्यात गॅप पडली तर डॉक्टरच चटईवर झोपायला सांगतात. आरे आपण कुठे ही श्रीमंती घेऊन जाणार आहोत. पण एक दिवस असा येईल की, तुम्हाला तुमची प्रगती समाधानाच्या पातळीवरती मोजावी लागेल.
सांगायचं तात्पर्य एवढंच की, पैशांचे मागे धावणे काही चुकीचे नाही. पण त्यासाठी वाईट मार्ग अवलंबू नका. नाहीतर जेवढं मिळतंय तेही हातून निघून जाण्याची शक्यता असते. आता कमीच मिळतंय म्हणून नाराज होऊ नका. वाट बघा, विचार करा, काम चांगलं करा, आधुनिक युगात अनेक पर्याय आहेत. ते शोधा आणि त्याप्रमाणे पुढे जाण्यासाठी मेहनत घ्या. आता जर गरजा भागवण्यापूरते पैसे मिळत असतील.
तर तणाव घेऊन किंवा इतरांशी तुलना करून ते अचानकपणे वाढणार नाहीत. मग जे काम, व्यवसाय करत आहात. त्यामध्ये वेगळं काही करता येईल का ते बघा. आता प्रत्येकाचे कामाचे क्षेत्र वेगळं असते. त्या माणसाला आपल्या क्षेत्रातील बऱ्याच गोष्टी बाबत ज्ञानही असते. अशावेळी दुसऱ्यांकडून आपल्या कामासाठी सल्ला घेणे गरजेचे वाटत नाही. पण इतरांचं मार्गदर्शन म्हणून नक्कीच ऐकू शकतो. आज ना उद्या प्रगतीही होणारच. फक्त संयम महत्वाचा असंच अनेक उद्योजक सांगत असतात.